सकाळची सफारी

ताडोबा भेटीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी कोअर झोनमध्ये पोहोचलो. पंचधाराकडे जाताना ताडोबा तलावाच्या अगदी पलीकडे तिरावर एकदम तीन वाघ दिसले.

उन्हात पाण्याच्या थंडाव्याचा मनसोक्त आनंद घेणारी “ताडोब्याची राणी” – “माया” आणि तिचे दोन मोठे बछडे.

वाघांपासून काही अंतरावर एक मादी सांबर सतर्क राहुन हळूहळू पाणी पित होती. जवळ येणारा रानडुक्कर (Wild Boar) पाहून जास्तच सतर्क झाली. तिथेच अडई (Lesser whistling duck) चा एक गट जवळील पाण्यात खेळत होता.

ताडोबा तलाव परिसरातील पक्षी आणि प्राणी

ताडोबा तलाव परिसरातील पक्षी आणि प्राणी

तलावाच्या पलीकडेच दुरवर पसरलेल्या जांभळाच्या झाडांखाली हरणांचा कळप गवत चरण्यात व्यस्त होता. तिथला संपूर्ण प्रदेशच इतका रंगीबेरंगी आणि वेगळा होता की मला इथे वर्णन केल्याशिवाय रहावले नाही. तलावाच्या या बाजुला जिथे पर्यटकांच्या जिप्सी थांबल्या होत्या तिथे जांभुळ व अर्जुन वृक्षांनी आच्छादलेला एक भाग होता. दोन्ही झाडे सदाहरित असल्याने त्यावेळीही झाडांखाली गडद रंगाची सावली पडलेली होती. तलावाच्या आजूबाजूला मैदानासारखा भाग, ज्यावरती हलके पिवळे (काहिसे वाळलेले) गवत तर अनेक ठिकाणी हिरवेगार गवत होते जणु निसर्गाने कुंचल्यातुन मारलेल्या रेषाच. या सर्व झाडांच्या आणि गवताच्या मध्यभागी निळे चमकणारे, संथ लाटांतुन एका लयीत आवाज करणारे तलावाचे पाणी. हेच पाणी तेथील प्राण्यांची तहान बारमाही भागवते. तलावाच्या बाजुंनी असणारी जांभळाची झाडे हिरव्यागार पानांनी भरलेली होती. झाडाचा शेंडा कोवळ्या हिरव्या पानांचा तर जसजसे खाली पाहु तसतसा पानांचा रंग गडद हिरवा होता. तलावापासुन लांब या झाडांच्या मागे फिकट गुलाबी, तपकिरी रंगाची सागवानी झाडे होती. या झाडांच्या वर काहिशी निळी आणि राखाडी आकाशाची पार्श्वभूमी. निसर्गाची ही रंगांची उधळण मन प्रसन्न करणारी होती.

ताडोबा तलाव परिसर

ताडोबा तलाव परिसर

उन्हात या वेळी ते वाघ काही तलाव सोडणार नव्हते. मग आमच्या मार्गदर्शकाने (गाईड) जंगलाच्या इतर भागात शोध घेऊयात असे सुचवले. थोडा लांबचा रस्ता पकडुन शोधत शोधत आम्ही “पांढरपौनी” नावाच्या पाणवठ्यावर पोहोचलो. आजुबाजूला घनदाट जंगल आणि मधोमध हा सपाट प्रदेश होता. तळ्यावर पाणी प्यायला एखादा वाघ येईल या अपेक्षेने आम्ही थांबलो. आजुबाजूला नीलगाय चरत होत्या. जवळच पिंपळाच्या झाडावरुन आणि जमिनीवरुन वानरांची टोळी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना आणि त्यात बसलेल्या प्राण्यांना न्याहाळत होती.

पंढरपौनी तेथील वानर

पंढरपौनी तेथील वानर

पंढरपौनी तेथील वानर

पंढरपौनी तेथील वानर

पांढरपौनी तळे पावसाळ्यात भरत असले तरी ते पाणी काही महिनेच पुरणारे होते. परंतु वनविभागाने वेगवेगळ्या तळ्याकाठी बोरींगद्वारे पक्षी आणि प्राण्यांसाठी बाराही महिने पाण्याची सोय केली होती. विशेष म्हणजे बोरींग हे सौर उर्जेवर चालणारे होते. या कडक उन्हाळ्यात थोडेफार पाणी शिल्लक होते जे बोरींगने सोडले जात. याच पाण्यात तहान भागवण्यासाठी कोतवाल (Black drongo),  खंड्या (Common kingfisher), टिटवी (Red wattled lapwing) आणि इतर पक्षी आळीपाळीने येत असत. तसेच काही हरणं आणि मोरही येत. थोड्या वेळात पिंपळाच्या झाडामागून एक घोरपड (Monitor Lizard) हळुहळु तळ्याकडे येताना दिसली.

हरीण आणि मोर

हरीण आणि मोर

घोरपड, ताडोबा

घोरपड, ताडोबा

तासभर वाट पाहिल्यानंतर आणि इतर प्राणी पक्ष्यांना बिनधास्त हिंडताना पाहिल्यावर आम्ही दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेतला. जाताना एका पक्ष्याचा जोरदार आवाज ऐकू आला. गाडी थांबवुन आजुबाजूला शोध सुरू झाला. शेजारीच वाळलेल्या झाडावर आकाराने मोठा, गडद पिवळ्या रंगाचे डोळे आणि वाऱ्याने डुलणारा त्याचा तुरा असलेला तुरेबाज गरूड (Crested hawk eagle) जोडीदाराला आवाज देत होता. दुरुन त्याच्या आवाजाला प्रतिसाद मिळताच मोठाले पंख उघडत उडुन गेला. त्याला प्रत्यक्ष जवळुन उडताना पहाणे एक अद्वितीय अनुभव होता.

तुरेबाज गरूड

तुरेबाज गरूड

ब्लॅकीसाठीची धावपळ

आम्ही ब्लॅकीला शोधत ती इतर पर्यटकांना जिथे दिसली त्या भागात जायचे ठरवले. शोधत शोधत “जामनी” नावाच्या भागात आलो. हा भाग उध्वस्त झालेल्या मानववस्तीसारखा होता. काही महिन्यांपूर्वी तिथे वस्ती होती. तिथल्या लोकांना सुरक्षेच्या आणि जंगल अधिवासाचा विचार करुन वनविभागाने सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले होते. अचानक आमच्या गाईडने जिप्सी थांबविली आणि एका जागेकडे पाहण्यास सुरवात केली. 

काळा बिबट्याचा आहे का तो?

काळा बिबट्याचा आहे का तो?

उत्सुकतेने आणि आनंदाने आम्ही झाडामागुन येणाऱ्या काळ्या आकृतीकडे पाहु लागलो. ब्लॅकी म्हणजेच काळा बिबट्या आम्हाला दिसला हा आनंद साजरा करणार इतक्यात एक मोठे अस्वल दिसायला लागले आणि त्या निराशेत पण आम्हाला जोरजोरात हसू आले!

अस्वल

अस्वल

काळे झुपकेदार केस, लांबलचक आणि तीक्ष्ण नखे असलेला तो एकला चलो रे करत काहितरी शोधत पुढे निघाला. आमच्या असण्याने त्याला काहीही फरक पडला नाही. तो जंगलरस्त्यावरुन काही अंतर आमच्या पुढे चालला आणि मध्येच झाडांमध्ये नाहीसा झाला. त्यानंतर आम्ही ताडोबा तलावाकडे निघालो आणि तलावाच्या अगदी शेवटपर्यंत माया तिथेच होती. सफारीची वेळ संपत आली होती. संध्याकाळच्या सफारीमध्ये मायाच्या या कुटूंबाला जवळून पाहण्याच्या आशेने बाहेर आलो.

संध्याकाळची सफारी

दुपारी साधारण ३ वाजता कोअर झोनमध्ये पोहोचलो आणि लगोलग ताडोबा तलावाच्या दिशेने निघालो. तलावाच्या जवळ पोहोचताच नजर माया आणि पिल्लांना शोधत होती पण जिथपर्यंत पाहता येईल तिथपर्यंत कुठेही त्यांचे दर्शन होईना. मधल्या वेळात तलाव सोडुन गेले की काय अशी शंका आली. पुढे पंचधाराकडे पाहु म्हणुन निघालो, तेवढ्यात दाट झाडांमधुन तलावाच्या काठावर माया तिच्या पिलांकडे पहात बसलेली दिसली.

ताडोबा तळ्याजवळ माया वाघीण

ताडोबा तळ्याजवळ माया वाघीण

तिची पिले समोरच पाण्यात डुंबत खेळत होती. मायाची बछडी एकदम खट्याळ ती काही तिला स्वस्थ बसू देईना. कधी तिच्या भावाला डिवचायची तर कधी पळत येऊन मायाला. काही वेळात मायाही त्यांच्याबरोबर खेळायला लागली. आमच्या पासुन अंदाजे २० मीटरवर हा सगळा खेळ चालू होता. वाघिण आई आणि तिच्या मुलांचं नातं एवढ्या जवळुन पाहताना वेळ कसा गेला कळालेच नाही. जवळपास तासभर त्यांना खेळताना, भांडताना पाहण्याचा आनंद मिळाला. नंतर तिघेही झाडांच्या सावलीत एकामागे एक बसले. सुर्याच्या प्रकाशाने पाण्याचा आणि विशेषतः या वाघांचा रंग सोन्यासारखा उजळुन दिसु लागला. पाण्याच्या हळुवार लाटा जणु पार्श्वसंगीताप्रमाणे ऐकु येत. मध्येच पक्ष्यांचा चिवचिवाट त्या निसर्गाच्या संगीतात भर घालत होता. हे सर्व क्षण तुम्ही आमच्या या व्हिडिओमध्ये अनुभवु शकता.

विडिओ पाहण्यासाठी क्लिक करा

ताडोबा तळ्याजवळ माया वाघिणीची पिल्ले दंगा मस्ती करताना

ताडोबा तळ्याजवळ माया वाघिणीची पिल्ले दंगा मस्ती करताना

ताडोबा तळ्याजवळ माया वाघिणीची पिल्ले दंगा मस्ती करताना

ताडोबा तळ्याजवळ माया वाघिणीची पिल्ले दंगा मस्ती करताना

भीतीदायक क्षण

बराच वेळ वाट पाहिल्यानंतर वाघांची फारशी हालचाल नसल्याने आम्ही पंचधाराकडे जायला निघालो. थोडेसे पुढे जाताच आमची गाडी अचानक बंद पडली. ड्रायव्हर आणि गाईड यांनी बराच प्रयत्न केला पण गाडी चालु होईना. आतापर्यंत सफारीचा वेळ वाया जातो एवढीच काळजी होती. पण तेवढ्यात ड्रायव्हर आणि गाईड यांनी गाडी तिथेच सोडुन काही अंतरावर फॉरेस्ट रेस्ट हाऊसवर पायी जाऊन मदत मिळवण्याचा निर्णय घेतला. आता मात्र आमची काळजी वेगळ्याच वळणावर गेली.

आमची गाडी जंगलाच्या मध्यात होती जिथे काही अंतरावर ३ वाघ होते तर एका ठिकाणी मगर सावलीमध्ये आराम करत होती. जसजसे ते दोघे गाडीपासुन चालत निघाले तसतसे आमच्यात शांतता पसरली. एकमेकांकडे आणि आजुबाजुला पाहत रहाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

राष्ट्रीय उद्यानात किंवा व्याघ्र प्रकल्पात एक नियम असतो, कोणीही गाडीतुन खाली उतरायचे नसते. पण जिवावर बेतल्यावर कसला नियम आणि कसले काय? अर्थात जंगलात पळुन जाऊन जाणार कुठे 🙂

एका गोष्टीची कल्पना होती की सहसा वाघ किंवा इतर प्राणी गाड्यांपासुन लांबच रहातात. त्यामुळे कुठे तरी एक दिलासा होता. पण एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे आमचे ड्रायव्हर आणि गाईड यांच्या धाडसाची. हिंस्त्र प्राणी असलेल्या जंगलात कोणत्याही संरक्षणाविना चालत जाणे याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यासाठी त्यांना साष्टांग दंडवत. अधेमधे इतर गाड्या तिथुन जात होत्या. जेव्हा जेव्हा गाडी येताना दिसत, आम्हाला वाटायचे ते आमच्यासाठी आलेत पण पर्यटकांना पाहिल्यावर निराशा व्हायची. आमची चौकशी करण्यापलीकडे ते काही करु शकत नव्हते.

ताडोबा तळ्याजवळ माया वाघिणीची पिल्ले

ताडोबा तळ्याजवळ माया वाघिणीची पिल्ले

४८ अंश सेल्सियस तापमानात असह्य उकाड्यात आम्ही जिप्सीमध्ये मदत येण्याची वाट बघत उभे होतो. सुदैवाने थोड्या वेळाने ढगांमुळे थोडीशी सावली मिळाली. जवळजवळ तासानंतर ड्रायव्हर आणि गाईड आमच्याकडे येताना दिसले. त्यांनी सांगितले दुसरी एक जिप्सी आपल्यासाठी येत आहे. नवीन जिप्सी आली आणि जमीनीला स्पर्श न करता आम्ही नवीन जिप्सीमध्ये गेलो. जवळपास दिड तास यामध्ये गेल्याने फारसा वेळ शिल्लक नव्हता. ताडोबा तलावाच्या दिशेने निघालो तेव्हा इतर गाड्यांमधील पर्यटक तलावाकडे न पाहता जवळच्या टेकडीकडे पाहताना दिसले. चौकशी केल्यावर समजले माया आणि बछडे काही वेळापूर्वी गाड्यांमधुन वाट काढत टेकडीवर जंगलाच्या दिशेने निघुन गेले.
आम्ही काही मिनिटांच्या फरकाने हा अविश्वसनीय क्षण गमावला. पण नंतर विचार केला, चुकुन ते गाडी बंद पडली तिकडे आले असते तर?…. बापरे!! 😅

जंगली कुत्र्यांची शिकार

टेकडीच्या दुसऱ्या बाजुला जाऊन हे कुटुंब दिसते का पहायच्या विचाराने परत पंचधाराकडे निघालो. दोन गाड्या एका जागी थांबुन त्यातील लोक आत झाडांत काहीतरी पाहत होते. एका गाडीत सुप्रसिद्ध वाईल्ड लाईफ फिल्म मेकर श्री नल्ला मुथ्थु सर कॅमेऱ्यातुन समोरचा क्षण चित्रीत करत होते. समोर काही जंगली कुत्र्यांनी एका सांबर मादीची शिकार केली होती. काही कुत्री तिचे लचके तोडण्यात व्यस्त होते तर काही कुत्री त्यांच्या वेळेची वाट बघत होते. ही घटनासुद्धा आमची गाडी बंद पडली तिथुनच काही अंतरावर घडली होती.

जंगली कुत्रा - ढोल सांबाराची शिकार खाताना

जंगली कुत्रा – ढोल सांबाराची शिकार खाताना

सुर्य मावळायला थोडा वेळ शिल्लक होता त्यामुळे आम्ही गेटच्या दिशेने निघालो. जाताना गाडीत एक प्रकारे शांतता होती कारण कुठेतरी जवळपास दिड तासाचा वेळ वाया गेल्याची भावना होती तर एका संकटातुन उशिरा का होईना सुखरुप बाहेर आल्याचा आनंद होत होता. जंगलात एका एका मिनिटांच्या क्षणात घटना घडतात ज्या पहाण्यासाठी एवढ्या लांबुन तिथे गेलेलो असतो पण म्हणतात ना जंगलात घालवलेला प्रत्येक क्षण एक वेगळा अनुभव देतो. अशा प्रकारे संध्याकाळची सफारी संपलेली होती आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळची एक सफारी शिल्लक होती.

राहिलेली त्या एका सफारीने आम्हाला ताडोबाच्या कधीही न विसरणाऱ्या चांगल्या आठवणी दिल्या. त्याबद्दल पाहु पुढच्या भागात.
Summary
ताडोबा - आनंदी आणि भीतीदायक क्षण
Article Name
ताडोबा - आनंदी आणि भीतीदायक क्षण
Description
आमची गाडी अचानक बंद पडली. आमची गाडी जंगलाच्या मध्यात होती जिथे काही अंतरावर ३ वाघ होते तर एका ठिकाणी मगर सावलीमध्ये आराम करत होती.
Author
Publisher Name
Travelclix
Publisher Logo
Share This: