ब्रिटिश मुळ असलेले हे व्यक्तिमत्व ज्यांच्या ३ पिढ्या ह्या भारतातच जन्माला आल्या आणि इथल्याच होऊन गेल्या. भारतीय लोकांनी त्यांना अशी काही भुरळ घातली की भारतीयांना (खासकरुन कुमाऊं च्या डोंगराळ भागातल्या लोकांना) ते इंग्रजी कुटुंब आपलेच लोक मानु लागले. पूर्वीची मनं ही बहुतांशी साफ आणि निर्मळ होती आणि त्यातुन तिथल्या डोंगराळ भागात राहणाऱ्या माणसांची मनं तर अजुनच भोळी आणि निष्कपट. त्या लोकांना कार्पेट साहिब “The Unspoilt Souls” म्हणायचे.

जेवढी आत्मीयता तिथल्या भारतीयांनी कार्पेट साहिब यांच्याबाबतीत दर्शवली तेवढीच किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त ही कार्पेट साहिब यांनी त्या भारतीयांप्रति बाळगली.

कुमाऊं (म्हणजे नैनिताल, गढवाल आणि अलमोरा यांनी मिळुन बनलेला संघटित प्रदेश) मधील जनता तर कार्पेट साहेबांना संत समजत असत जो त्यांच्या दु:खांना आपलेसे करुन त्यांची अनेक संकटांमधुन सुटका करण्यासाठीच जणु जन्माला आला होता. विलक्षण सामाजिक बांधिलकी व्यतिरिक्त ह्या माणसाचे पराक्रम तर अचाट आहेत. त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच ख्रिस्तोफर कॉर्बेट यांच्या निधनानंतर जेव्हा कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती खालावते तेव्हा वयाच्या २० व्या वर्षी हा मुलगा नोकरी मागायला जातो आणि “लहान वयाचे” कारण पुढे करुन त्याला ती नोकरी नाकारली जाते. तेव्हा मोठ्या आत्मविश्वासाने तो मुलगा म्हणतो “ठीक आहे, मी पुढच्या महिन्यात परत येईन आणि तेव्हा मात्र तुम्ही हे कारण देऊ शकणार नाही कारण तेव्हा मी २१ वर्षांचा असेन” हे वाक्य ऐकुन त्याच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले जाते आणि त्याला ती नोकरी मिळते.

Edward James Corbett
वयाच्या २० व्या वर्षी हा मुलगा आपल्या संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो, त्याच बरोबर पुढच्या काही वर्षांत नोकरीच्या ठिकाणी अनेक अविश्वसनीय कामगिऱ्या (ज्यांच्याबद्दल पुन्हा सविस्तर पोस्ट करेन) करुन दाखवल्यानंतर जेव्हा आर्थिक परिस्थिती सुधारते तेव्हा तोच मुलगा जो आता तरुण कर्तापुरुष झालेला असतो, आपल्या कालाढुंगीत असणाऱ्या अनेक गरीब कुटुंबाना आर्थिक मदत करतो. अजुन एक मोठा पराक्रम आणि “दैवीमनाचा” पुरावा देणारी गोष्ट म्हणजे “छोटी हल्द्वानी” नामक एका सुंदर गावाची रचना (पुनर्रचना खरेतर) करुन गरीब आणि गरजु लोकांना राहण्याची तसेच शेतीची सोय करुन देतो त्याबदल्यात काहीही घेणे तर सोडाच उलट स्वतःहुन त्यांना दरवर्षी देत राहतो. त्यांच्या सगळ्या समस्या एका कुटुंबप्रमुखा प्रमाणे सोडवतो. दरवर्षी नफ्यातुन येणारा लाभांश (डिव्हिडंड) हा माणुस “छोटी हल्द्वानी” च्या बाजुने संरक्षक दगडी भिंत बांधण्यावर खर्च करतो आणी १० वर्षात तब्बल ६ किलोमीटर लांब आणि ५ फूट १० इंच एवढी उंच असणारी ती भिंत बांधुन पुर्ण होते ज्यामुळे गावातील लोकांच्या शेतीचे वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान आणि परिणामी सुड भावनेतुन होणारे वन्य प्राण्यांचे नुकसान टाळुन दोन्ही बाजुने प्रश्न सोडवतो.

कार्पेट साहेबांना भारत स्वातंत्र्यानंतर १९४८ ला साधारण हा देश सोडावा लागला आणि ते केनिया मध्ये “न्येरी” येथे जाऊन राहु लागले. तरीही ते त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत म्हणजेच १९५५ पर्यंत छोटी हल्द्वानी मधील अनेक कुटुंबांतर्फे सरकार ला “९१८ रुपये” वार्षिक स्वरुपात कर म्हणुन स्वतः भरत होते. ते गाव आजही आहे आणि त्या गावातील लोक आजच्या दिवशी एकत्र येऊन गाणी म्हणतात जी त्यांच्या आदरणीय कार्पेट साहिबांच्या आठवणी ताज्या करतात.

कार्पेट साहेबांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत जसे की “कैसर-ए-हिंद” (means Emperor-of-India) आणि दुसरा एक महत्वाचा म्हणजे “Freedom Of Forests” जो संपुर्ण भारतात त्याकाळी फक्त २ लोकांनाच मिळालेला होता आणि त्यातलेच एक म्हणजे कार्पेट साहिब. या पुरस्कारांतर्गत त्यांना भारतातल्या कोणत्याही अरण्यात, वनात, संरक्षित क्षेत्रात कोणत्याही कारणास्तव जाण्याची पुर्ण परवानगी होती आणि त्यासाठी स्थानिक सरकारकडुन कोणत्याही परवान्याची अथवा कसल्याही चौकशीला सामोरे जाण्याची गरज नव्हती.

कुमाऊं मध्ये आणि संभवत: देशातील इतर भागात होणाऱ्या शिकारींची समस्या ओळखुन याच अवलियाने भारतातील प्रथम “हॅले राष्ट्रीय उद्यान” म्हणजेच “Hailey National Park” ची स्थापना तत्कालीन United Province चे गव्हर्नर मॅलकॉम हॅले यांची मदत घेऊन केली. याचा मुख्य उद्देश वन्य प्राण्यांमधील आणि अरण्याच्या सान्निध्यात असणाऱ्या मानवी वस्तीतील लोकांमध्ये उद्भवणाऱ्या संघर्षामुळे होणारी अपरिमित हानी होऊ नये हा होता. तेच उद्यान आता “कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान” – Corbett National Park म्हणुन प्रचलित आहे.

अजून एक पराक्रम म्हणजे, ज्यावेळी “ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस” च्या मालकाने (जो एक चांगला मित्र होता कॉर्बेट यांचा) कार्पेट साहिबांना त्यांच्या थरारक अनुभवांचे लेखन करण्याचे सुचविले आणि ते पुस्तक स्वरूपात छापण्याची कबुली दिली तेव्हा “मॅन इटर्स ऑफ कुमाऊँ” या पुस्तका चे लेखन सुरु झाले आणि जेव्हा हे प्रकाशित करण्यात आले तेव्हा १९४४ ची हि गोष्ट, त्या पुस्तकाचा खप हा ४,८९,००० चा आकडा पार करून गेला होता. एवढी प्रचंड विक्री हि फार कमी लेखकांच्या नशिबी आली होती आणि त्यातले एक हे कार्पेट साहिब होते आणि आजही तो खप सुरूच आहे. या पुस्तकांच्या जगभर विक्रीमधुन येणारा नफा हा कार्पेट साहिबांनी भारत आणि ब्रिटन मधल्या अंध व्यक्तींच्या (युद्धामध्ये अपघातामुळे अंध झालेले सैनिक विशेषकरून) सुविधेवर खर्च केला.

या माणसाने अनेक कुटुंब उध्वस्त होण्यापासुन वाचवली, अनेकांना मार्गी लावलं, वन्य प्राणी आणि मानवी वस्तीतील संघर्ष रोखण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

दुसऱ्या जागतिक महायुद्धात महत्वाची कामगिरी बजावली, नरभक्षक प्राण्यांपासुन अनेक गावांचा प्रश्न स्वतःचा जीव धोक्यात घालुन सोडवला. वेळोवेळी गावातील लोकांना वन्यप्राण्यांबद्दल आणि त्यांच्या अस्तित्वाबद्दल जागरुक केले. त्यांच्या स्वतःच्या राहत्या घरात छोटेखानी दवाखाना उभा केला जिथे १९४७ पर्यंत हजारो लोक बरे झाले आणि तिथेच अगणित वैद्यकीय समस्यांवर उपचार पण झाले. यात वाखाणण्याजोगी बाब म्हणजे त्या हजारोंमध्ये मोठी संख्या ही भारतातल्या गरिबांची होती जे आपल्या उपचारांसाठी पैसे देऊ शकत नव्हते आणि त्यांच्यासाठी हा दवाखाना मोफत उपलब्ध होता.

वयाच्या २१ व्या वर्षी मोकामेह घाट मध्ये पर्यवेक्षक म्हणुन नोकरी मिळाली तीही अतिशय अवघड आणि जिकिरीचे काम असणारी ज्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये ते काम हाताळण्यासाठी शक्यतो कोणी तयार होत नसे ते काम कार्पेट साहिब यांनी मोठ्या पराक्रमाने करुन दाखवले अर्थात त्यासाठी “राम सरन” यांची लाभलेली साथ आणि शेकडो गरीब आणि गरजु पण अत्यंत प्रामाणिक कामगार यांची कार्पेट साहिबांप्रति असलेली विश्वासार्हता. जेव्हा ते जिकिरीचे आणि प्रचंड काम मार्गी लागले आणि सुरळीत झाले तेव्हा तिथल्या कामगारांना, अधिकाऱ्यांना आणि कार्पेट साहिबांना कामाच्या व्यापातुन थोडा वेळ मिळु लागला तसे त्यांनी राम सरन यांचे स्वप्न पुर्ण करण्याचे ठरवुन तिथल्या गरीब मुलांसाठी शाळा सुरू केली आणि कामगारांसाठी करमणुकीचे तसेच क्रीडा मंडळ स्थापन केले जिथे Inter-Railway matches सुरु केल्या ज्यामुळे कामगारांचे मनोधैर्य राखुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत होईल.

जेवढे लिहावे तेवढे कमीच… आज २५ जुलै, कार्पेट साहिबांचा जन्मदिवस म्हणुन त्यांच्या स्मरणार्थ केलेला ह्या लेखप्रपंचा बरोबरच अश्या या अवलीयाला माझा मनःपुर्वक नमस्कार!

~ केदार लक्ष्मीकांत कुलकर्णी.
छायाचित्र: My Kumaon – Uncollected Writings of Jim Corbett पुस्तकामधुन घेतलेले आहे.

Summary
Photo ofजिम कॉर्बेट
Name
जिम कॉर्बेट
Share This:

इतिहास कार्पेट साहिब ~ जिम कॉर्बेट

Edward James Corbett उर्फ जिम कॉर्बेट यांचा जीवनपट म्हणजे अनेक चांगल्या, वाईट, करुणामयी, प्रेमळ, आपुलकीयुक्त आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चित्त थरारक तसेच प्रसंगी जीवघेण्या अनुभवांचा जणु खजिनाच. लहान वयात (८ – ९ वर्षांचा असताना) हा मुलगा कसलीही भीती न बाळगता आसपासच्या अरण्यात जाऊन एकट्याने दिवस रात्र हिंडत, बागडत काढायचा तेही हिंस्र प्राण्यांचा वावर असताना. जेव्हा ते ८ वर्षांचे होते तेव्हा ते कालाढुंगीच्या आसपास असणाऱ्या अरण्यात जायचे, रात्र झाली असता एका टेकडीवरच्या मोठ्या झाडाखाली शेकोटी पेटवुन झोपायचे. रात्रीच्या चांदण्यांत थंडगार वाऱ्यामध्ये वर आकाशाकडे बघत बघत झोपी जायचे. मधुनच वन्य प्राण्यांच्या आवाजाने जागे व्हायचे… वाघ, बिबट्या सारखे प्राणी जवळुन जात असताना इतर प्राण्यांच्या चित्काराने हे जागे व्हायचे. कितीदा असे प्राणी यांच्याजवळ काही फुटांवर आले असता पेटलेल्या शेकोटी मध्ये लाकडाचा एक ओंडका टाकुन हे पुन्हा झोपी जायचे आणि तेही मनात भीतीचा कसलाही विचार न आणता, अश्या अनेक रात्री त्यांनी अरण्यात काढल्या आहेत म्हणुनच असे वाटते की या माणसाने अरण्याला जेवढे आपलेसे केले तेवढेच त्या अरण्याने देखील यांना आपलेसे केले होते.